ठाणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या तीन दिवसपासून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे सुरु झाल्यानंतर आज महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे.एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली.
सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरूनही उद्धव ठाकरेंना सुनावले. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उपरोक्त टोला लगावला.
महाविकास आघाडी ही फक्त स्वार्थासाठी झाली होती. लोकसभा निवडणुकांमध्ये फेक नरेटीव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मते घेतली. मते मिळाल्यानंतर मतदान करणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नागरिकांनी विधानसभेला त्यांना त्यांची जागा दाखवली, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली.
अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, मला शिव्या शाप आणि आरोप करण्याशिवाय त्यांनी दुसरे काही केले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. त्यांना तुरुंगात टाकण्याचे कारस्थान केले. तू राहशील नाही तर मी राहीन, अशी भाषा वापरली. मी बोलू शकत नाही, असे शब्द वापरले. मात्र, आता काय जादू झाली ते आपण पाहिले. सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.