परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील परभणीमध्ये वसमत रोडवर दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी (काल) रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील वसमत रस्त्यावर शिवशक्ती अपार्टमेंट समोर तुलसी या उपहारगृहासमोर एक वडापावची गाडी आहे. या गाडीत ठेवलेल्या दोन गॅस सिलेंडरचा शनिवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पाठोपाठ दोन मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे.
वसमत रस्त्यावर एक वडापावचा गाडी आहे. त्या गाडीच्या चालकाने नेहमीप्रमाणे आपले व्यवहार आटोपून रात्र घर गाठले, परंतु रात्री सव्वा बाराच्या सुमारास या स्टॉलमधील एका सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. यात गाडी जळून खाक झाली. परिसरातील नागरिकांनी आगीच माहिती अग्निशमन दलाला दिली. पण अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्टॉलमधील दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत स्टॉल पूर्णतः जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णतः आटोक्यात आणली आहे. दरम्यान स्टॉलवरील कढईतील गरम तेल सिलेंडरवर पडल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.