नशिराबाद : प्रतिनिधी
येथील ताजनगर परिसरात वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने अचानक घरांची पाहणी व चौकशी केली. त्यात अनधिकृतपणे वीज चोरी करणाऱ्या सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे सव्वा दोन लाखांची वीज चोरी उघडकीस आली आहे, अशी माहिती सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने शहरातील थकबाकीदार तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी ताजनगर परिसरात सुमारे ५० घरांची वीज तपासणी केली. त्यात सात ठिकाणी अनधिकृतपणे, वीज सुरू असल्याचे निदर्शनास आले.
लागलीच त्यांचे वीज कनेक्शन खंडित करून वीज मीटर जप्त करण्यात आले आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येत आहे. सहायक अभियंता पवन वाघुळदे, संदीप निरंजन व नशिराबाद शहरातील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत.