जळगाव : प्रतिनिधी
कांदा विक्री करून मिळालेले २२ हजार २०० रुपये घेऊन घरी जाण्यासाठी बसमध्ये चढताना नरेंद्र युवराज पाटील या शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) टॉवर चौकात घडली. काही अंतरावर बस गेल्यानंतर ही घटना शेतकऱ्याच्या लक्षात येताच बस शहर पोलिस ठाणे परिसरात आणली. याठिकाणी पोलिसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली, मात्र, रक्कम सापडली नाही. त्यामुळे बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतकरी नरेंद्र पाटील यांनी शनिवारी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता. कांदा विक्री केल्यानंतर त्यांना २२ हजार २०० रुपये मिळाले होते. ही रक्कम घेऊन ते टॉवर चौकात आले या ठिकाणी ते यावल आगाराच्या बसमध्ये (क्र. एमएच ०७, सी ७४३९) चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातून पैसे चोरले. ही बस शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या पुढे गेल्यानंतर पाटील यांना खिशात पैसे नसल्याचे समजले. त्यांनी ही बाब वाहकाला सांगितली. त्यानंतर बस थेट शहर पोलिस ठाण्यात आणली. याठिकाणी शहर पोलिस कर्मचारी किशोर निकुंभ व उद्धव सोनवणे यांनी प्रवाशांची तपासणी केली. मात्र, रक्कम मिळून आली नाही. त्यानंतर बस पुन्हा यावलकडे रवाना करण्यात आली