जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून शेख शोएब शेख शकील (२८, रा. पिंप्राळा) हे एका ठिकाणी थांबलेले असताना डिक्कीतून चोरट्याने एक लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. ही घटना १० जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील शेख शोएब शेख शकील हे एका खासगी वित्तीय संस्थेत (फायनान्स बँक) नोकरीला आहेत. १० जानेवारी रोजी त्यांनी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून ८३ हजार रुपये काढले व त्यांच्याजवळील १७ हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये एका पिशवीत ठेवले. ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. चित्रा चौकात जात असताना एका ठिकाणी थांबले व बाजूला गेले. त्यावेळी दुचाकीवर दोन जण आले व डिक्कीतून ही रक्कम काढून पसार झाले. नागरिकांनी आरडाओरड केल्याने शेख शोएब हे दुचाकीजवळ आले व काही अंतरापर्यंत चोरट्याचा पाठलाग केला. मात्र चोरटे भरधाव वेगाने तेथून पसार झाले.