परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघातासह आग लागल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच गंगाखेड आगाराची लातूर – परभणी बसला गंगाखेड वरून परभणीला जात असताना दैठणा गावाजवळ अचानक आग लागली. चालक मुंडे यांनी बस थांबवल्याने डिझेल टाकीकडे जाणारी आग आटोक्यात आली. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. ही घटना आज (दि.९) सकाळी ९: ३० च्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड आगाराची बस (एम एच 20 बी एल 2691) लातूर येथे मुक्कामी असते. ही बस कोद्री मार्गे गंगाखेडहून परभणीला आज पहाटे 5 च्या दरम्यान निघाली होती. सकाळी 9:30 च्या दरम्यान दैठणा गावाजवळ चालक महादेव मुंडे यांना डिझेलचा अधिकच वास येत असल्याचे लक्षात आले. वाहक चंद्रकांत ममलवार यांना बसच्या केबिनच्या खाली आगीचा भडका उडाल्याचे दिसले. चालक, वाहक यांनी प्रवाशांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परभणी व गंगाखेड येथून अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवली.
गंगाखेड आगारामधील बसेस डबघाईला आलेल्या आहेत. 5 जानेवारीरोजी धनगर मोहा येथे अचानक चालकाच्या केबिनमध्ये आग लागली होती. त्यानंतर आज बसला आग लागल्याची दुसरी घटना घडली आहे. गंगाखेड आगारात एकूण 62 बस असून यात 10 वर्षेपूर्वी नविन बस आल्या होत्या. त्यानंतर इतर आगाराच्या जुन्याच बसेस दिल्या आहेत. एकीकडे प्रवाशी संख्या वाढत असताना बसेसची संख्या अपुरी आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.