सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मोठ्या अडचणीत फसले असतांना आता त्यांच्या मुलाचा प्रताप उघडकीस आला आहे. वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचे अर्जात म्हटले आहे. दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने तिघांविरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन, सोलापूर पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली आहे. मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या महिलेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या महिलेने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाल्मीक कराडच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
या प्रकरणी सोलापूर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागविले आहे, आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून आरोपींचे वकील आज हजर नसल्यामुळे पुढील सुनावणी ही 13 जानेवारी रोजी होणार आहे. मूळचे सोलापूर येथील महिला, तिचा पती आणि दोन मुलांसह परळी येथे राहायला होते. संबंधित महिलेचा पती हा सुशील वाल्मिक कराड याच्या ट्रेडर्समध्ये कामाला होता. सुशील कराड याने तिच्या पतीला दोन बल्कर ट्रक, दोन कार आणि जागा कसं काय कमावला; म्हणून मारहाण केली. सुशील कराड याने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने घरातून उचलून नेत तिच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे याच्या नावावर कोणतेही पैसे न देता खरेदी केला तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने स्वत:कडे ठेवले, असा आरोप तिने केले आहेत.