मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची माहिती लवकरच कोर्टाला दिली जाणार आहे.
संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 6 जणांवर आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे नामक एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. सीआयडीने या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.
बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना गरज भासली तर या प्रकरणात मकोका लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात प्रत्यक्ष मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या 7 जणांवर मकोका लावण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराडवर सध्या आवादा पवनचक्की कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सध्या मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही. पण बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भविष्यात वाल्मीक कराडवरही या कायद्यांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.