पाचोरा : प्रतिनिधी
बनावट महिलेकडून प्लॉटची खरेदी खत नोंदणी गुन्ह्यातील आरोपींकडून पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी लॅपटॉप प्रिंटर हस्तगत केले आहे. याप्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या मनोज बन्सीलाल बेडवाल (३२) रा. जारगाव याला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संतोष भिला सोनवणे (३७, नांद्रा, ता. पाचोरा) याने पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिलेला उभे करून शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या मालकीच्या प्लॉटची विक्री केली होती. या प्रकरणी दुय्यम निबंधकांनी गन्हा दाखल केला होता यातील प्लॉटच्या मोबदला रकमेपैकी ५ लाख रुपये रोकड आरोपींकडून हस्तगत करण्यात आली. तसेच बनावट आधारकार्ड तयार करणारा सीएससी सेंटर जारगावचा मनोज बन्सीलाल बेडवाल (३२, रा. जारगाव) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर जप्त केले आहे.
त्याने यातील महिलेचे बनावट आधारकार्ड तयार करून दिले होते. त्या वरून महिलेने दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदवले. दरम्यान ती बनावट महिला जळगाव येथील असून आरोपीने तशी कबुली दिली आहे. लवकरच त्या महिलेला अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी सांगितले.