जळगाव : प्रतिनिधी
जेवणाचे पार्सल घेण्यासाठी जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप वानखेडे यांना राँगसाईडने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वानखेडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी संशयित देवेंद्र योगेश भिलमाळ- बडगुजर (वय १९, रा.भोकर) याला अटक केली.
तपासधिकारी मीरा देशमुख या संशयितांचा शोध घेत असताना पोलिस दलाच्या नेत्रम या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कॅमेऱ्यांची तपासणी केली. यामध्ये दुचाकीस्वार भरधाव असल्यामुळे धूसर दिसणाऱ्या दुचाकीचे फुटेज प्राप्त केले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासचक्रे फिरवीत त्यांनी धडक देणाऱ्या दुचाकीचा शोध घेतला. जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय ५५, रा. खोटेनगर) हे २६ डिसेंबरला दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेजवळ जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने वानखेडे यांना धडक दिल्यानंतर तो पसार झाला होता.