चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करत घरावर दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सारंग अशोक बेलदार वय ४९ रा. पोतदार हायस्कूल चाळीसगाव याच्या घरासमोर मंगळवारी ७ जानेवारी रोजी ११.४५वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर सहा जण आले. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकान हवेत गोळीबार केला. तर सारंग बेलदार याच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले तर पार्च बाहेर काचेची बाटली फोडून शिवीगाळ करत दुचाकीवरून पसार झाले. हा गोळीबार जुन्या वादातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. गोळीबार करून संशयित आरोपी हे फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे पोलीसांनी संशयित आलेल्या संकेत उर्फ बाळू मोरे रा. हनुमान वाडी चाळीसगाव याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरातून ६ जिवंत काडतूस, पिस्टल मॅगझीन, कोयता, गुप्ती, स्टील रॉड आणि बेसबॉल खेळण्याची लाकडी बॅट असा घातक हत्यारे मिळून आले आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करीत आहे.