जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शालीग्राम शर्मा (वय ५५, रा. प्रेमनगर) यांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खोटेनगर ते मानराजपार्कदरम्यान, उड्डाणपुलावर घडली. यावेळी मिटींग आटोपून जळगावात येत असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ श्री.अंकीत यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
जळगाव तालुक्यातील बांभोरी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शर्मा हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री काम आटोपून विना क्रमांकाच्या बुलेटने घराकडे निघाले. खोटे नगर उड्डाणपुलावरुन जात असतांना त्यांना मानराज पार्कजवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात पंकज शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी तेथून जात असलेले जि. प. सीईओ श्री. अंकीत यांनी शर्मा यांना सीआरपी देण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी प्रतिसाद देत नसल्याने सीईओ श्री. अंकीत यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यावेळी तेथून जात असलेल्या नागरिकांनी शर्मा यांची ओळख पटविली. त्यानंतर शर्मा यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी, विवाहित मुलगी प्राची आणि दोन मुले पराग, प्रतिक असा परिवार आहे.