जळगाव | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे.या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत.अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गावकारभारी दबावाखाली असतात.सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून राज्यातील ग्रामपंचायती एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहेत,असे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्व.संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन येत्या गुरुवारी 9 जानेवारी रोजी
एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचे
संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शासनाला कळवत जाहीर केले आहे.संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना इमेलद्वारा याबाबत मागणी निवेदन देऊन कळवले आहे की,राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र असून लोकप्रतिनिधी म्हणून आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गाव खेड्यातील सामाजिक वातावरण चांगले राहण्यासाठी सरपंच व सर्वच गावकारभारी असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणं अत्यंत गरजेचे आहे.सरपंच हा पब्लिक सर्व्हन्ट असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निर्णय आहे त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादवी 353 आताचे भारत न्यायसंहिता 132 प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा,तरच गावच्या विकासकामात अडथळा आणणाऱ्यावर जरब बसेल.गावच्या हितासाठी समाजसेवेमध्ये भाग घेणाऱ्या सरपंचांना व त्यांना मदत करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक आहे.अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
सरपंच परिषदेने शासनाकडे केलेल्या यासंबंधी मागण्या अशा :
1. सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा.
2. प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण कंपल्सरी करण्यात यावे.
3. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी.
4. स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी.
5. स्व.संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभे करावे.
6. सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावे.
7. ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा.
राज्य पदाधिकाऱ्यांचे आवाहन :
शासनाचे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 जानेवारी (गुरुवारी) एक दिवसीय कामबंद आंदोलनात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.पूर्व
विदर्भ विभाग प्रमुख प्रमोद गमे (नागपूर) राज्य कार्यकारणी सदस्य संजय कांबळे (कोल्हापूर) अमरावती विभाग प्रमुख दादा लवकर (बुलढाणा) कोकण विभाग प्रमुख अतुल लांजेकर (रत्नागिरी) मराठवाडा विभाग प्रमुख दासराव हंबर्डे (नांदेड) पश्चिम महाराष्ट्र प्रमूख प्रदीप माने (सांगली) उत्तर महाराष्ट्र प्रमुख वासुदेव नरवाडे (जळगाव) आदिवासी विभाग प्रमुख राहुल गावित (नंदुरबार) यांच्यासह रावेर लोकसभा विभाग अध्यक्ष रुपेश गांधी व जळगाव लोकसभा विभाग अध्यक्ष सचिन पवार यांनी हे आवाहन केले आहे.