जळगाव : प्रतिनिधी
दीड महिन्यापूर्वी गणेश कॉलनीत बांधकामाच्या ठिकाणी इमारतीवरून पडून मुलाचा मृत्यू झाला तर आता डोळ्यासमोरच पतीचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाला. पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) असे मृत पतीचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता लमांजन येथे गिरणा नदीपात्रात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाईसह शनिवारी खर्ची (ता. एरंडोल) येथून लमांजन (ता. जळगाव) येथे नातेवाइकांकडे पायी चालतच गेले. गिरणा नदी ओलांडत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यामध्ये ते पडले. पाणी खोल असल्याने ते बुडायला लागले. पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाळू माफियांनी नदीतून वाळू ओरबडल्याने नदीत मोठे खड्डे झालेले आहेत, पाण्यामुळे त्याचा अंदाज येत नाही. या खड्डयांनीच मराठे यांचा जीव घेतला. दीड महिन्याभरापूर्वी मोठा मुलगा मनोज याचा जळगावात बांधकामाच्या ठिकाणी काम करताना मृत्यू झाला तर आता पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, गिरणा नदीत वाळू उपशामुळे पडलेले खड्डे लोकांच्या जीवावर उठल्याचे सांगून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.