यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील साकळी येथे किरण बापू माळी (३५) यांचा अल्पशा आजाराने दि. ३ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर माळी यांची मुलगी निधी (वय १०) हीनेच वडिलांचे अंत्यसंस्कार केले. बालिका दिनीच ही घटना घडली. तिने मन खंबीर करत आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिला.
सविस्तर वृत्त असे कि, साकळी येथील महाजन वाडा भागातील रहिवासी असलेल्या किरण बापू माळी या उच्चशिक्षित युवकाची अल्पशा आजाराने दि. ३ रोजी भल्या पहाटे तीन वाजेदरम्यान जळगाव येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. या घटनेने गावात शोककळा पसरली. त्यानंतर शुक्रवारीच दुपारी १२ वाजता मृत किरण माळी यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. किरण माळी यांची एकुलती एक मुलगी निधी हिने वडिलांचे अंत्यसंस्कार केले. दहा वर्षांच्या चिमुरडीला वडिलांचे अंत्यसंस्कार करताना पाहून गावकऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले होते. माळी हे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, आई, वडील, भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.