जळगाव : प्रतिनिधी
शहरातील राजमालती नगर परिसरात जून्या वादातून दोन गटात हाणामारी होवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. यावेळी एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या गटातील काही जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मारहाण करणारे संशयित फरार झाले होते. फरार झालेल्या सात जणांच्या शहर पोलिसांनी राजमालती नगरातून मुसक्या आवळल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ७ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, जून्या वादातून राजमालती नगरात दोन गटातील वाद पुन्हा उफळून दगडफेकीसह हाणामारीची घटना दि. २० नोव्हेंबर रोजी राजमालती नगरात घडली होती. यामध्ये एका गटातील सिद्धार्थ माणिक वानखेडे यांचा मृत्यू झाला होता तर दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले होते. दरम्यान, दुसऱ्या गटातील जखमी राजू पटेल शहर पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार मारहाण करणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हे फरार झाले होते. हे संशयित राजमालती नगरात आल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, किशोर निकुंभ, संतोश खवले, योगेश पाटील, दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने संशयित राजकुमार अजय सुरवाडे (वय २७), प्रेम उर्फ छोटू विजय सुरवाडे (वय ३८), भूषण उर्फ मटका पंडीत रांजण (वय २१), मंगेश सुभाष काजवे (वय २८), दिनेश दीपक माने (वय ३४), रविंद्र उर्फ रवी सुर्यभान जंजाळे (वय ३८) व गौतम उर्फ पिंट्या लक्ष्मण बिऱ्हाडे (वय ३९, सर्व रा. राजमालती नगर) यांच्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुसक्या आवळल्या.