जळगाव : प्रतिनिधी
सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका बेरोजगार युवकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवत ९ लाख ८६ हजारांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या युवतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कॉलनी परिसरात २६ वर्षीय तरुण वास्तव्याला आहे. तो बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी त्याला भाषा मुखर्जी, असे नाव सांगणाऱ्या महिलेने मेलवरून तसेच मोबाइलवरून संपर्क साधून नोकरी देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. चांगली नोकरी लावून देते, असे सांगून तरुणाकडून वेळोवेळी ९ लाख ८६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलिसात तक्रार दिली. बुधवारी, जळगाव सायबर पोलिस ठाण्यात भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीष गोराडे हे करीत आहेत.