नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणा-या मनू भाकर हिला खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा केली. 17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11:00 वाजता राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर सरकारने अनेक खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठे आणि संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. ज्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक किंवा संस्थांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि भारतीय खेळांच्या विकासात योगदान दिल्याबद्दल सहा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमधील सहा प्रमुख पुरस्कार म्हणजे खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद करंडक (ज्याला माका ट्रॉफी देखील म्हणतात) आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2004 पासून सहा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसह देण्यात आला आहे.