जळगाव : प्रतिनिधी
जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर कामांकडे पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष असून, ते सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस ठाण्यात कामानिमित्त गेलेल्या प्रवीण अशोक महाजन (३३, रा. गणेश कॉलनी) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व पोलिस ठाण्यात डांबून ठेवल्याने निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपाचे जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, मारहाण झालेले प्रवीण महाजन यांनी पोलिस अधीक्षकांना वेगवेगळे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थ्यांना मादक पदार्थ देतात व व्यसन लावतात. तसेच भजे गल्लीमध्ये हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु विक्री, कोठे कंटणखाने सुरु आहेत मात्र याकडे पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष असून, ते सामान्य नागरिकांना त्रास देत आरोप केला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात यावी, अन्यथा ४ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.