मुंबई : वृत्तसंस्था
जगातील अनेक देशात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे.
नववर्षाच्या निमित्ताने सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासून हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, यासाठी भाविक मंदिरात जमले आहेत. नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना आखल्या जात आहेत. तर पहिली आरती अनुभवण्यासाठी उत्साह शिगेला पोहोचला आहे. काही भाविक पहिली लोकल पकडून, तर काही चालत मंदिरात पोहोचले.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी असंख्य भाविक रांगेत उभं राहून दर्शन घेत आहेत. पहाटेपासूनच आतापर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतलं आहे. सध्या हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे.