जळगाव : प्रतिनिधी
लहान मुले खेळत असल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन लोखंडी रॉड व विटांनी दुखापत करण्यात आली. ही घटना सोमवारी (३० डिसेंबर) घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील दिलीप फकिरा थोरात (३२, रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लहान मुले खेळत असताना वाद होऊन अबरार हमीद खाटीक उर्फ चिरक्या (१९) याच्यासह चार जणांनी थोरात व त्यांचे शालक कन्हैया अहिरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दुसऱ्या गटातील अबरार हमीद खाटीक (१९, रा. उस्मानिया पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहान मुलांच्या खेळण्यावरून दिलीप थोरात यांच्यासह चार जणांनी अबरार व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच एकाने अबरार यांच्या डोक्यात वीट मारून दुखापत केली.