जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहरातील एका ठेकेदाराला लोखंडी सळईचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गौरव अनिल मनवानी (वय २५) हे रेल्वे विभागात ठेकेदारीचे काम करतात. १४ डिसेंबर रोजी त्यांना श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फोन करत ‘तुम्हाला लोखंडी सळईचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल’ असे सांगितले. १४ ते २३ डिसेंबरच्या दरम्यान मनवानी यांनी संशयिताला वेगवेगळ्या बँक खात्यांतून ‘एनईएफटी’च्या स्वरूपातून एकूण ४० लाख ९६ हजार ९२० रुपये पाठवले. मात्र, रक्कम दिल्यानंतरही कंत्राट मिळत नसल्याने, ठेकेदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव मनवानी यांनी बुधवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल केला.