जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कांचननगर भागात गुप्ती घेऊन दहशत माजवत असलेल्या एका हद्दपार आरोपीच्या मंगळवारी रात्री शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रवींद्र सोनवणे (वय २६, रा. कांचननगर) असे त्याचे नाव आहे. गणेशवर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपासून जिल्ह्यात अनधिकृतीरीत्या प्रवेश करून तो कांचननगर भागात राहत होता.
मंगळवारी रात्री ११ वाजेदरम्यान गणेश हा कांचननगर भागात गुप्ती घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती मिळाली. त्यानंतर शनिपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी अमोल वंजारी, विकी इंगळे, मुकुंद गंगावणे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी गणेशला ताब्यात घेतले. त्याच्यावर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील हे करत आहेत.