जळगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकांवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत दोन ट्रॅक्टर जमा केले आहेत. तर ६ हजार रुपये किमतीचा वाळूचा साठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा सुरूच आहे. सोमवारी रात्री १०:३० वाजता निमखेडी शिवारातील एका हॉटेलसमोरून ट्रॅक्टरमधून अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर जमा करून, चालक आकाश संतोष कोळी (वय २७, रा. दिनकरनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी कारवाई मंगळवारी सकाळी ६:३० वाजता खोटेनगर स्टॉपजवळ करण्यात आली आहे. याठिकाणीही ट्रॅक्टर जमा करण्यात आले असून, तुकाराम रामचंद्र सोनवणे (वय ३५, रा. सावखेडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास अनिल मोरे हे करत आहेत.