प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ व समाज बांधव यांच्या मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
“राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं” हा छत्रपतींचा आदर्श घेऊन रयतेच्या राजाच्या जयंतीनिमित्त कुणबी पाटील समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण करून मंगल कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर समाजाचे जेष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, रामचंद्र पाटील, गुलाब पाटील, दत्तू पाटील, भगवान पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व माल्यार्पण करण्यात आले. समाजाच्या सर्व सदस्यांनी महाराजांचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली.
जवळजवळ मागील ३५ वर्षांपासून पै – पै गोळा करून समाज बांधवांनी जो पैसा उभा केला त्या पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक करून खऱ्या अर्थाने चीज करण्यात आले. आजपर्यंत ज्या सर्व लोकांनी समाजाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे केले त्यांच्या श्रमाचे हे फलित आहे. समाजकार्य करतांना व्यक्तिगत हित बाजूला ठेवून सर्वस्व झोकून दिले तर हे सर्व घडत असतं. कार्यक्रम प्रसंगी सर्व दिवंगत संचालकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ज्या ज्या संचालकांनी त्यांचे पूर्ण आयुष्य खर्ची घालून समाजाला उभारी देण्याचं कार्य केलं परंतु ती सर्व दिग्गज मंडळी आज या जगात नाहीयेत त्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा आज संकल्प करण्यात आला. एरंडोल रोड ला लागून असलेले श्रीराम नगर येथे १७ हजार स्के.फु. च्या जागेवर भव्य मंगल कार्यालय बांधले जाणार, असा निर्धार सर्व समाज बांधवांनी व्यक्त केला. याप्रसंगी समस्त पाटील समाज पंच मंडळ, लहान माळी वाडा चे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील यांच्यासह सर्व लहान माळी वाडा परिसर येथील समस्त कुणबी पाटील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.