भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील नाहाटा चौफुलीजवळ मंगळवारी पहाटे १:३० वाजता अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले. या डंपर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व इतर आवश्यक कागदपत्रे नव्हती. यामुळे एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे १.३० वाजता एलसीबीचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना नाहाटा चौफुलीजवळ विना क्रमांकाचा डंपर आला. पोलिस कर्मचारी संदीप पोळ यांनी डंपर थांबवत चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, गिरीश सानप (रा. जळगाव) याने कागदपत्रे सादर केली नाही. तो कुठलाही परवाना नसताना वाळूची अवैधपणे वाहतूक करत होता. तसेच डंपरवर क्रमांकदेखील नव्हता. यामुळे पोळ यांनी डंपर जप्त करून बाजारपेठ पोलिस ठाण्यात जमा केला. याबाबत पोळ यांच्या फिर्यादीवरून सानपवर गुन्हा करण्यात आला आहे.