जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली, या घटनेत १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील या मुलाचा मामा व मोठी बहीण गंभीर जखमी झाले आहेत. योजस धीरज बन्हाटे (रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योजस हा मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बन्हाटे यांच्या सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला जात होता. दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत, घटनास्थळी आमदार सुरेश भोळे पोहचले व संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
घरातून निघाल्यानंतर अवघ्या ३०० मीटर अंतरावर झालेल्या अपघातात एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच योजसच्या आई-वडिलांवर दुःखांचा डोंगर कोसळला. योजसच्या घरी त्याचे भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे आले होते संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७:१५ च्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस यांच्यासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात असताना डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात योजसचा मृत्यू झाला.
डंपर पेटविल्यानंतर त्याठिकाणी आलेले अग्निशमन वाहनदेखील जमावाने रोखून धरले. जमावाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याने जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, जमाव आणखीनच संतप्त झाला. पोलिसांवरदेखील जमाव संताप व्यक्त्त करीत होता. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे कालिका माता चौक परिसरात तणाव निर्माण झाला.