यावल : प्रतिनिधी
तुमच्या मुलास एका गुन्ह्यात पकडले आहे, त्याला सोडवायचे असेल तर तत्काळ पैसे द्या… असे सांगत यावल येथील एका वृध्द दाम्पत्याची एक लाख तीस हजारात फसवणूक झाली. याबाबत यावल पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विस्तारित भागात राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले इसम आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा एरोली, मुंबई येथे नोकरीला आहे. बुधवारी त्यांना व्हॉट्सअपवर कॉल आला. संशयिताने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत ‘तुमच्या मुलाला गैरकृत्यप्रकरणी ताब्यात घेतले आहे, असे सांगत पैशांची मागणी केली. मुलाची भयभीत अवस्थेतील बनावट ऑडिओ क्लिपदेखील ऐकवली. मुलाच्या घाबरलेला आवाज ऐकून दाम्पत्याने लागलीच एक लाख ३० हजार रुपये संशयिताच्या खात्यावर पाठवले. पैसे पाठवल्यानंतर तत्काळ त्यांनी मुलाला कॉल केला. तेव्हा मुलाने आपण मुंबई येथे सुरक्षित आहोत, अशी कुठली घटना घडली नव्हती, असे सांगताच आपली फसवणूक झाल्याचे वृद्ध दाम्पत्याच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी ऑनलाइन तसेच यावल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली.