जळगाव : प्रतिनिधी
जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल चित्रकूट येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून हॉटेल चालक, व्यवस्थापक व त्यांना मदत करणारा अशा तीन जणांना अटक केली. तसेच या हॉटेलमधून एका महिलेला व तेथून जवळच असलेल्या हॉटेल यश येथून एका महिलेला ताब्यात घेतले. अटक केलेल्या नीलेश राजेंद्र गुजर (२४, रा. रामेश्वर कॉलनी), चेतन वसंत माळी (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव), विजय सखाराम तायडे (३२, रा. खेडी, ता. जळगाव) या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना माहिती मिळाली होती. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी पोकॉ. गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार कलम ३, ४, ५(१) (क), ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात येऊन रविवारी न्यायालयात हजर केले असता, तिघा संशयित आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर दोन्ही महिलांची आशादीप शासकीय महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे.