जळगाव : प्रतिनिधी
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातात घाबरून चिमुकला इतरत्र गेल्याने घटनास्थळावरून त्याच्या वडिलांना काही जणांनी रुग्णालयात नेल्याने दोघांची ताटातूट झाली. दुसरीकडे हा मुलगा रडत पप्पा-पप्पा करीत फिरत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता तेथे त्याचे वडीलही आढळले. यातून बालकाची ओळख पटली व त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा आर.एल. चौफुलीजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित प्रभाकर भालेराव (२५, रा. निमगूळ, ता. धुळे) हे मुलगा ऋषिकेश भालेराव (३ वर्षे) याच्यासह दुचाकीने जात असताना आर. एल. चौफुली जवळील एका हॉटेलनजीक त्यांची दुचाकी घसरली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे भयभीत झालेला ऋषिकेश चालत-चालत इतरत्र निघून गेला. इकडे नागरिकांनी रोहित यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र जखमी झालेला चिमुकला हा रक्तबंबाळ अवस्थेत परिसरात पप्पा पप्पा करीत रडत फिरत होता याविषयी काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नितीन ठाकूर व राहुल घेटे यांनी बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. त्याची ओळख पटत नसल्याने बालकाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून ओळख पटविण्याचे आवाहन केले जात होते. पोलिसांनी बालकाला शासकीय रुग्णालयात दाखल केले.