रावेर : प्रतिनिधी
शहरातील दोन मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फैजपूर येथील ढाब्यावर गेलेल्या सहा मित्रांच्या कारला पिंपरूड- सावदा महामार्गावर गुरुवारी रात्री अपघात होऊन तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेला चौथा मित्र तथा शहरातील फोटोग्राफर गणेश संतोष भोई (२७, रा. नेमाडे प्लॉट, रावेर) याचा रविवारी दुपारी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महात्मा गांधी चौकातील रहिवासी मुकेश किशोर रायपूरकर व अक्षय उन्हाळे या मित्रांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र शुभम दशरथ सोनार, जयेश केशव भोई, विनय विजय जाधव व सिनेमॅटिक फोटोग्राफर गणेश संतोष भोई हे सहा जण शुभम दशरथ सोनार याच्या चारचाकी कारने फैजपूर येथील एका ढाब्यावर गुरुवारी रात्री गेले होते.
वाढदिवस साजरा करून घरी निघालेल्या या मित्र परिवाराच्या सुसाट कारवरील चालक तथा मालक शुभम दशरथ सोनार याचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून शुभम (वय २५) व मुकेश (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अत्यावस्थेतील जयेश केशव भोई (वय २४) याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करत असतांनाच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पिंपरूड-सावदा महामार्गावर सावदा शिवारात शनिवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
दरम्यान, यातील गंभीर अत्यावस्थेतील गणेश संतोष भोई (वय २६) यास जिल्हा सामान्य रुग्णालयात व तद्नंतर तातडीच्या उपचारासाठी एका खासगी ट्रॉमा सेंटरमध्ये व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले होते. तब्बल ६३ तास मृत्यूशी निकराची झुंज देत दीड वर्षीय बालकासह पत्नीचा कोवळा संसार सोडून गेला तसेच आईवडिलांसह दोन धाकट्या भावांचा कर्ता आधार नियतीने हिरावून घेतला. रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले