जळगाव : प्रतिनिधी
उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून रोहिदास श्रावण कोळी (३४, रा. कांचननगर) यांना दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने पोटावर वार केला. यात कोळी यांना गंभीर दुखापत झाली असून पुन्हा आल्यास जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकीदेखील त्यांना दिली. ही घटना शुक्रवारी (२० डिसेंबर) तालुक्यातील रिधर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन नगरातील रोहिदास कोळी यांच्याकडे ट्रॅक्टर असून त्यावर प्रभाकर कोळी हे चालक आहे. चालक कामावर येत नसल्याने त्याविषयी प्रभाकर कोळी हे विचारणा करण्यासाठी गेले असता त्याने येण्यास नकार दिला. त्यावेळी त्याला दिलेले १० हजार ५०० रुपये परत मागितल्याने त्याचा त्याला राग आला व चालकासह भाच्याने रोहिदास कोळी यांना शिवीगाळ करीत लोखंडी वस्तू पोटावर मारत धमकी दिली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गुलाब माळी करीत आहेत.