भुसावळ : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील एका ढाब्याजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. दरम्यान घटनेच्या चौकशीत बनावट नोटा आढळून आल्याच्या प्रकार दि. १७ रोजी रात्री ११ वाजता समोर आला. याप्रकरणी दि.१९ डिसेंबरला नाशिक येथील तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ १७ रोजी रात्री ११:३० वाजता चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हिरामण कारभारी धात्रक (वय ४६, रा. नाशिक) यांचा मृत्यू झाला होता. तर सोबत असलेले नरेंद्र दत्ता मुळे (वय ५४) आणि विजय देवराम काळे (वय ३२, दोन्ही रा. नाशिक) हे जखमी झाले होते. पोलिस कर्मचारी योगेश पालवे यांच्या फिर्यादीवरून मृत हिरामण कारभारी धात्रक, जखमी नरेंद्र मुळे, विजय काळे यांच्यावर गुरुवारी तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि नंदकिशोर काळे हे करीत आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यासोबत वाहनातील सर्व वस्तू रुग्णालयात आणल्या होत्या. जवळपास २ लाख ३० हजारांची रोकड जखमी व मृत व्यक्तीसोबत होती. मात्र या रकमेत १००, ५०० रुपये दराच्या बनावट नोटा मिळाल्या. यावेळी ५६ हजार २०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. जखमी बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने पोलिसांनी बनावट नोटा, ८ मोबाइल जप्त केले आहेत.