जळगाव : प्रतिनिधी
पहूर नाशिक महामार्गावर दुभाजकावर ट्रक आदळून उलटला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. दिशा दर्शविणारे फलक नसल्याने दुभाजक अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. तातडीने फलक लावण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर ते नाशिक महामार्ग हा पहूर गावातून जातो. पहूर ग्रामीण रुग्णालय ते संगमेश्वर महादेव मंदिर दरम्यान दुभाजक टाकण्यात आला आहे. संगमेश्वर महादेव मंदिराजवळ हा दुभाजक संपत असून याला दिशादर्शक असणारे फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यामुळे हा दुभाजक लक्षात येत नाही. शुक्रवारी पहाटे (एम. एच. २८ बी.बी. ५९९२) क्रमांकाचा कापसाचा ट्रक चाळीसगाव येथून मलकापूर येथे जात असताना दुभाजकावर आदळला. चालक विजय विठोबा चव्हाण थोडक्यात बचावले. हा दुभाजक लक्षात येत नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.
महामार्ग हा पहूर गावातून गेला आहे. या महामार्गावरील दुभाजक लक्षात येत नसल्याने वाहने यावर आदळतात. असे अनेक अपघात घडले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबत फलक बसविण्याची अनेक मागणी करून दुर्लक्ष केले जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. फलकअभावी मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तातडीने फलक बसविण्याची यावे, अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.