जळगाव : प्रतिनिधी
साखरपुड्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे वंदना अशोक गोराडे (वय ४९, रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, ट्रकच्या चाकाखाली आल्याने या महिलेच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात महिलेचे पती अशोक सुखदेव गोराडे (६०) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथील अशोक गोराडे यांच्या वाहनचालकाच्या मुलाचा शुक्रवारी चांदसर येथे साखरपुडा होता. त्यासाठी गौराडे हे पत्नी वंदना गोराडे यांच्यासह दुचाकीने (एमएच १९ डीजे ४७९६) तेथे जात होते. शुक्रवारी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास टॉवर चौकाकडून शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच २१ एबी ७४६६) जोरदार धडक दिली.
या अपघातात वाहनावरील गोराडे दाम्पत्य खाली पडले आणि वंदना गोराडे या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला, त्यात त्या जागीच गतप्राण झाल्या. अपघातानंतर शहर पोलिस ठाणे व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व मृतदेह, तसेच जखमीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मृताच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.