फैजपूर : प्रतिनिधी
मोलमजुरी व शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या दोन आदिवासी महिलांनी दोन दिवसांत आपली जीवन यात्रा संपविण्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ रोजी गीता प्रकाश बारेला (३८) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली तर २० रोजी शुक्रवारी रंगुबाई प्रकाश भिलाला (२०) या महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फैजपूर येथील यावल रस्त्यावर असलेल्या एका गॅरेजच्या मागे झोपडीत आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या गीता प्रकाश बारेला या महिलेने गुरुवारी झोपडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली या महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले केले. याप्रकरणी प्रताप बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना ताजी असतानाच २० रोजी हिंगोणा शिवारातील बोरखेडा धुल्यापाडा येथे सुभाष त्रंबक आढाळे यांच्या तुरीच्या शेतात रंगुबाई प्रकाश भिलाला या महिलेने काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सुकलाल भिलाला यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण, ज्ञानेश्वर चौधरी, अब्बास तडवी करीत आहेत.