सावदा : प्रतिनिधी
भरधाव चारचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार तर तीनजण जखमी झाले. ही भीषण घटना पिंपरूड ते सावदा (ता. रावेर) मार्गावर गुरुवारी रात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरात होती की कारचे चार तुकडे होऊन अक्षरशः चुराडा झाला आहे. शुभम सोनार (२१), मुकेश रायपूरकर (२६) आणि जयेश भोई (२०) अशी या अपघातातील मृतांची तर विजय जाधव, गणेश भोई व अक्षय उन्हाळे अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा वाढदिवस साजरा करून वरील सहाही जण एका कारने भुसावळहून रावेरकडे येत होते. पिंपरूड-सावदा मार्गावर त्यांच्या कारने एका निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. यात दोनजण जागीच ठार झाले. एकाचा जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. जखमी तीनही जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सावदा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सावदा येथील काही युवक भुसावळ येथे रेल्वे स्टेशनवर नातेवाइकांना सोडून परत येत होते, त्यावेळी रस्त्यात त्यांना हा अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी लागलीच सावदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपघातग्रस्त युवकांना वाहनातून बाहेर काढत दवाखान्यात रवाना केले. यात सावदा येथील संभाजी मित्र मंडळाचे मुर्तजा बोहरी, सोनू तांबटकर, साईराज वानखेडे, गौरव चौधरी आदींचा समावेश होता. अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी मृत व जखमींच्या परिवाराशी संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही त्यांनी माहिती घेतली.