नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीने सरकार स्थापन केले असून या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, छगन भुजबळ यांची पक्ष सोडण्याची हिंमत नाही. त्यांनी पक्ष सोडून दाखवावा, असे आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे. सुहास कांदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान न देऊन अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला असल्याचे सुहास कांदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा वाद विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील पाहायला मिळाला होता. कांदे हे भुजबळांचे कट्टर विरोधक म्हणूनही ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यमंत्रीमंडळात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आपल्याला आनंद झाला असल्याचे कांदे यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले. छगन भुजबळ यांचे ज्या – ज्या वेळेस काही वाईट होते, त्या – त्या त्यावेळी मला आनंद होतो, असे देखील कांदे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांची पक्ष सोडून जाण्याची हिंमत नाही. त्यांनी पक्ष सोडून दाखवावा, असे आव्हान देखील त्यांनी भुजबळ यांना दिले आहे.