पाचोरा : प्रतिनिधी
महिलेने नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे सादर करून पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालयात बिनशेती प्लॉटची परस्पर विक्री करत खरेदीखत नोंदवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर दोन साक्षीदारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पुंडलिक काशीनाथ पाटील (रा. जारगाव), अक्षय आधार बडगुजर (रा. लोहारी) अशी अटकेत असलेल्या साक्षीदारांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते १:३० च्या सुमारास हा प्रकार घडला. या बनावट महिलेने गट नंबर १३४च्या २मधील प्लॉट नंबर ९ क्षेत्रफळ १८० चौरस मीटर हा शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या मालकीचा प्लॉट नगराज गोविंदा अहिरे यांना विक्री केला. तशाप्रकारचे खरेदीखत तिने नोंदवले. दुय्यम निबंधक एस. एस. भास्कर यांची दिशाभूल करीत या बनावट महिलेने दि. ७ रोजी दस्त नोंदणी केली. फसवणुकीची ही बाब लक्षात येताच दुय्यम निबंधक भास्कर यांनी पाचोरा पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार फिर्यादीमध्ये नमूद केला होता.
आपण शीतल सुनीलकुमार पाटील असल्याचे भासवून या बनावट महिलेने हा प्लॉट एजंटकरवी नगराज यांना विक्री केला. दरम्यान, काही महिन्यांनी शीतल पाटील यांनी उतारा काढला असता त्यांच्या ही धक्कादायक बाब लक्षात आली. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच शीतल सुनीलकुमार यांनी दस्त नोंदणी रद्द करण्याचा अर्ज केला. त्यानंतर निबंधकांनी पाचोरा पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून बनावट महिलेचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.