जळगाव : प्रतिनिधी
घराबाहेर दुचाकी उभी करून पार्सल देण्यासाठी गेलेल्या ‘कुरियर बॉय’च्या बॅगमधून एका जणाने दोन पार्सल चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि. १७ डिसेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गणपतीनगरात घडला. बॅगमधून चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत युवराज पवार (३७, रा. पिंप्राळा) हे कुरियर वाटपाचे काम करतात. मंगळवारी (दि. १७ डिसेंबर) दुपारी १२ वाजता दिवसातील पहिलेच पार्सल देण्यासाठी ते गणपतीनगरात गेले. त्यांनी दुचाकी घराच्या बाहेर उभी करून ते पार्सल देण्यासाठी गेले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका जणाने दुचाकीवर ठेवलेल्या बॅगेतून टी-शर्ट आणि जॅकेट असलेले अंदाजे १० हजार रुपये किमतीचे दोन पार्सल चोरून नेले. दुचाकीजवळ आल्यानंतर हा प्रकार पवार यांच्या लक्षात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले.