जळगाव : प्रतिनिधी
शैक्षणिक संस्थेला भाडेतत्त्वावर जागा देण्याचे ठरल्यानंतर इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यासह साहित्याची खरेदी करण्यात आली. मात्र, मालकाने जागा देण्यास नकार देत संस्थाचालक युवराज प्रकाश बारी (३५, रा. धनश्रीनगर) यांची एक लाख ७१ हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार २४ जून २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी, संतोष पदमसिंग पवार (६५, रा. मुंबई) व राजेश भरत जाधव (रा. ओमशांती नगर, पिंप्राळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज बारी यांची शैक्षणिक संस्था असून, त्यांना प्ले ग्रुप, नर्सरीचे वर्ग सुरू करण्यासाठी जागा हवी होती. त्यांनी संतोष पवार व राजेश जाधव यांच्या इमारतीसाठी त्यांच्याशी चर्चा केली व ही इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे ठरले. यात काही रक्कम डिपॉझिट म्हणून दिली व इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी करायची असल्याने तो खर्च करण्याची तयारी बारी यांनी दाखविली. होणारा हा खर्च नंतर हिशेबात वजा करण्याचेही ठरले. त्यानुसार बारी यांनी इमारतीचे काम करण्यासह तेथे काही साहित्यही तयार केले.नंतर मात्र पवार व जाधव यांनी सदर घर विक्री असल्याची जाहिरात करणे सुरू केले व बारी यांनी तयार केलेल्या साहित्याची तोडफोडही केली.
याविषयी बारी यांनी दोघांना समजावत झालेल्या चर्चेनुसार जागा मिळण्याची मागणी केली. मात्र, तरीदेखील काही उपयोग न झाल्याने युवराज बारी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संतोष पवार, राजेश जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहेत.