जळगाव : प्रतिनिधी
रक्कम तिप्पट करण्याचे आमिष दाखविण्यासाठी बेंग घेणाऱ्याला केवळ ताब्यात घ्यायचे आहे, असा बनाव करायचा असला, तरी त्यासाठी आलेल्या पोलिसांनी स्वतःच्या गणवेशाचा वापर करीत वर्दीतच हे कृत्य केले. मात्र, काही रकमेचा मोह या पोलिसांना चांगलाच महागात पडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराचा पोलिस कर्मचारीच मास्टर माइंड आहे. याप्रकरणी जळगावच्या पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तपासाअंती हे पोलिसच असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यामुळे जळगावात एका स्पर्धेदरम्यान त्यांची सचिन धुमाळ याच्याशी ओळख झाली, ते एकमेकांच्या संपर्कात आले. काही दिवसांपूर्वीच ते राजस्थान येथे फिरायला गेले होते. त्याचवेळी माझ्याकडे एकजण रक्कम तिप्पट करून देणारा असल्याचे धुमाळ याने सांगितले. घरी परतल्यानंतर तो या विषयी वारंवार विचारणा करू लागला. त्यानुसार, विकास पाटील हे सोमवारी १६ लाख रुपये घेऊन जळगावात आले. येथे धुमाळ त्यांना भेटला व आपल्या बॅगेत २० लाख रुपये असल्याचे सांगत ते रेल्वे स्थानकावर गेले. तेथे एकजण आला आणि तो बॅग घेऊन गेला. त्याच्यामागे हे दोघे जात असताना दोन पोलिस गणवेशात आले आणि ते बॅग घेऊन जाणाऱ्याला घेऊन गेले.
कोणत्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी रेल्वे स्थानकावर गेले होते का, यासह वेगवेगळ्या मार्गाने या घटनेचा तपास करण्यात आला. त्यात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकों दिनेश भोई (फैजपूर) या तीन पोलिसांचा सहभाग असल्याचे समोर आले, तसेच रक्कम घेऊन जाणाऱ्या नीलेश अहिरे याचेही नाव निष्पन्न झाले. त्यावरून त्यांचा शोध घेत पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. अटकेची कारवाई सुरू असलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके व पोकों दिनेश भोई या तीन पोलिसांना थोड्या-फार रकमेचा मोह चांगलाच महागात पडला आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिस त्या व्यक्तीला पोलिस अधीक्षक कार्यालयात घेऊन गेल्याचे पाटील यांना सांगण्यात आल्याने ते आणि धुमाळ हे तेथे पोहोचले. मात्र, तेथे कोणत्याही पोलिसांनी कोणाला आणले नसल्याची माहिती मिळाली. याविषयी पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. तसेच याबाबत सोमवारी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून सुरुवातीला धुमाळ याच्यासह इतर तीन अनोळखी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.