जळगाव : प्रतिनिधी
जळगाव एसटी डेपोमधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचा चालक आनंद माळी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले आणि तत्परता दाखवत गाडी थांबवण्यास सांगून प्रवाशांनी विभाग नियंत्रकांकडे तक्रार केली. घटनास्थळी तत्काळ येत विभाग नियंत्रकांनी दुसऱ्या चालकाला बोलावून बस मार्गस्थ केली. मद्यधुंद चालकावर विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगाराची बस (एमएच १४/बीटी२३०४) ही बाभूळगाव या गावाला दररोज रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री सुमारे ५० प्रवासी असलेली बस बाभूळगावाला निघाली. पाळधी गावाजवळील पुलाजवळ प्रवाशांना एसटीचा चालक आनंद माळी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे लक्षात आले. प्रवाशांनी पाळधीजवळील एका हॉटेलजवळ बस थांबवून वाहकाला याबाबत सांगितले. या प्रकाराची माहिती प्रवाशांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनाही दिली. जगनोर यांनी बस थांबलेल्या ठिकाणी येत प्रवाशांशी चर्चा करून दुसऱ्या चालकाची व्यवस्था केली.
काही दिवसांपासून जळगाव विभागातील बसेसच्या अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यात सोमवारी मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांनी भरलेली एसटी आनंद माळी चालवत असल्याने दिसून आले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यात मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यानुसार विभाग नियंत्रक जगनोर यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत मंगळवारी जगनोर यांनी तत्काळ आगारप्रमुखांची बैठक घेऊन हिवाळ्यात सध्या अंधार लवकर पडत असल्याने मुक्कामी गाड्यांना लवकर मार्गावर सोडणे, तसेच एसटीच्या चालकांना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कडक सूचना देण्यात आल्या.