बोदवड : प्रतिनिधी
बोदवड ते मुक्ताईनगर रस्त्यावर नाडगावजवळील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनर दोन दुचाकींना धडकले. या अपघातात पाच मजूर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, नाडगाव येथील तरुण जखमींच्या मदतीला सरसावले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने नेपानगरकडून (मध्यप्रदेश) बोदवडकडे येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली व तो पसार झाला. अपघातात दुचाकीवरील पाचजण जखमी झाले आहेत. यात सुनील भिलाला (२२, नेपानगर) यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून अनिल डोंगरसिंग गिराडे (२२) याच्या हातापायाची बोटे तुटली आहेत. अपघातात अन्य एकजण तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील दोन तरुण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच नाडगाव येथील अक्षय खोडके, तेजस राणा, अमोल व्यवहारे, शंभूसिंग राणा, सोमनाथ राजपूत, सचिन राजपूत, आकाश नखोत, प्रीतेश पाटील, किरण कोळी यांनी तीनजणांना तत्काळ वाहनातून बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सारोळा येथील दोन तरुणांना परस्पर मुक्ताईनगरच्या जिल्हा उप रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बोदवड येथील नगरसेवक पुत्र हर्षल बडगुजर यांनी जखमींना तात्काळ रुग्णवाहिका मिळवून दिली.