नागपूर : वृत्तसंस्था
नागपूरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आज दि.१७ ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
आज नागपूर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहोचले असून यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. वास्तविक परंपरेप्रमाणेच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा देखील झाली. मात्र या चर्चेमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाचा कोणताही मुद्दा चर्चेत आला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब हे देखील उपस्थित होते.
यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरुण सरदेसाई आदी नेते उपस्थित होते.