वृध्द महिलेला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला शिकविला धडा
पोलीस निरक्षक शंकर शेळके यांनी तात्काळ मदत केल्याने वृध्द महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले !
गावकऱ्यांसमोर वृध्द महिलेची तरूणाने मागितली माफी
उत्कृष्ट कामगिरी केल्याने गावकऱ्यांमध्ये खाकीची ‘कॉलर झाली टाईट’
एकटे वृध्द व्यक्तींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही- पो.नि. शंकर शेळके
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : पोलीस म्हटलं म्हणजे बंदूक, काठी आणि मारहाण हे सर्वसामान्य माणसासमोर चित्र उपस्थित होते. परंतू धरणगाव पोलीसांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखवून सर्वसामान्य माणसांमध्ये आदराची भावना निर्माण केली आहे. तालुक्यातील साकरे येथील महिलेला शिवीगाळ करून तिचे अंड्याचे नुकसान करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी पकडून महिलेसह तिच्या कुटुंबियांकडे माफी मागविण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी महिलेला नुकसान भरपाई केल्याने वृध्देच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
संक्षिप्त घटना
धरणगाव तालुक्यातील साकरे येथे दारूच्या नशेत एकाने शिवीगाळ करून महिलेच्या हातातील अंड्यांचा ट्रे फेकून नुकसान केले आणि तिच्या मुलाला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना तात्काळ गरजू माहिलेला नुकसान भरपाई दिल्याने वृध्द महिलेने आभार मानले.
तर घडलं असं की,
धरणगाव तालुक्यातील साकरे येथे रहिवाशी वृध्द महिला लिलाबाई बन्शीलाल बाविस्कर या एकट्या राहतात. अंडी विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा संजय बाविस्कर हा मुंबईत कामाच्या निमित्ताने राहतो. दरम्यान गुरुवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लिलाबाई यांनी धनराज बन्सीलाल सोनवणे याच्याकडे अंड्यांचे राहिलेले पैसे मागितले. त्यावेळी धनराज सोनवणे हा दारूच्या नशेत होता. लिलाबाईने पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यांना शिवीगाळ केली व त्यांच्या हातातील अंड्याचा ट्रे फेकून नुकसान केले. लिलाबाईचा मुलगा संजय बाविस्कर हा गावावरून आल्यानंतर याबाबत जाब विचारण्यासाठी गेला असता त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत संजय बाविस्कर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी धनराज बन्सीलाल सोनवणे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस ठाणे शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक पाटील हे करीत आहे.
धरणगाव पोलीसांचा मोठेपणा
दरम्यान संजय बाविस्कर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी महिलेला बोलावून त्यांचे अंड्याचे ट्रेचे नुकसान झाले म्हणून तातडीने मदत केली. तसेच संशयित आरोपी धनराज सोनवणे याला खाक्या दाखविल्याने वृध्द महिलेची माफी मागितली आणि यापुढे वृध्द महिलेला मदत करण्याचे आश्वासन धनराज सोनवणे याने दिले आहे. त्याचप्रमाणे गावातील एकटे राहणारे वृध्द व्यक्तींना कुणीही त्रास दिला तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिला आहे.