जळगाव : प्रतिनिधी
दुचाकीचा कट लागल्याच्या करणावरुन दोन जणांनी अमिन युनूस मन्यार (वय २८, रा. खंडेराव नगर) या तरुणाला दगडासह कड्याने बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १४ रोजी नेरीनाका स्मशान भूमीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात अमिन युनूस मन्यार हे वास्तव्यास असून ते इलेक्ट्रीशनचे काम करतात. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना समोरुन येणाऱ्यांना अमिन मन्यार यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरुन त्या दोघांनी मन्यार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढतच गेल्याने त्या दोघांनी मन्यार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीस्वार तरुणाने दगडाने तर त्याच्या मागे बसलेल्याने कड्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी मन्यार यांनी तात्काळ शनिपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या दोघ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बोदवडे हे करीत आहे