जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ममुराबाद येथील योगेश उर्फ शुभम कैलास शेटे (वय २४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथे योगेश उर्फ शुभम शेटे हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. दुपारच्या सुमारास घरात एकटाच असतांना शुभमने घराचा दरवाजा लावून दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी शुभम दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आईने खिडकीतून डोकावून बघितले असता, त्यांना शुभम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यावेळी त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेत दरवाजा तोडून शुभमला खाली उतरविले. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. शुभमच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.