रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सावदा शहरात बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना सावदा पोलिसांनी अटक केली होती. तर या प्रकरणात तिसरा फरार झाला होता. त्यास भुसावळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा शहरातील ख्वाजा नगरमधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना १३ डिसेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १०० रुपयांच्या ७६ बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. तर या दोघांना बनावट नोटा विक्री करणारा तिसरा आरोपी आवेश (भुसावळ) याला सावदा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून या रॅकेटचा पर्दाफॉश होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांनी भुसावळ येथील आवेश नामक व्यक्तीकडून ४ हजार रुपयांना १० हजारांच्या बनावट नोटा विकत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. मात्र, आवेश फरार असल्याने त्याने बनावट चलनी नोटा कुठून आणल्या, या बाबत खुलासा होत नव्हता. दरम्यान, सावदा पोलिसांनी सापळा रचून आवेशला भुसावळातून शिताफीने अटक केली. त्यामुळे आता त्याने बनावट नोटा कुणाकडून आणल्या, त्याच्यामागे आणखी कोण व मोठे रॅकेट आहे काय? त्यांनी या नोटा कोठे चलनात आणल्या आहेत काय? याबाबत पोलिस तपासात समोर येईल. या घटनेचा तपास सावदा पोलिस करत आहेत.