जळगाव : प्रतिनिधी
शहरातील भरवस्तीत फातेमानगरात घरात सुरू केलेल्या रिफिलिंग सेंटरवर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी छापा टाकून ३४ व्यावसायिक व घरगुती सिलिंडर जप्त केले. सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील फातेमानगर परिसरात एका घरात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईमध्ये शोएब शेख शफी (२०, रा. फातेमानगर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.
कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते यांनी केली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.